बडनेरा ते शिंगणापूर चौफुलीपर्यंत वृक्षारोपण मोहीम राबविण्याची मागणी
वाढत्या तापमानावर नियंत्रण व पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांची अपेक्षा
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
विदर्भात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाची गरज निर्माण झाली आहे. अमरावती-यवतमाळ मार्गावरील बडनेरा ते शिंगणापूर चौफुली तसेच चांदूर रेल्वे रोडच्या दोन्ही बाजूने राजुरा या गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सार्वजनिक बांधकाम विभागाने पिंपळ, वड आणि निंब या वृक्षांची लागवड करावी, अशी मागणी नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
अमरावती-यवतमाळ मार्ग हा जिल्ह्यातील प्रमुख दळणवळणाचा मार्ग असून या मार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. त्याचप्रमाणे चांदूर रेल्वे हा महामार्ग सुद्धा महत्वपूर्ण असून या रोडने कुठेही झाडे नसल्याने सावलीचा अभाव जाणवत आहे या दोन्ही प्रमुख महामार्गावर मात्र अनेक ठिकाणी सावली देणाऱ्या वृक्षांचा अभाव असल्याने उन्हाळ्यात प्रवाशांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो. त्याच प्रमाणे चांदूर रेल्वे रस्त्याने राजुरा या गावापर्यंत या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळण्याबरोबरच परिसरातील तापमान कमी होण्यास मदत होईल.
पिंपळ,वड आणि निंब ही झाडे पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त मानली जातात. ही झाडे मोठ्या प्रमाणात प्राणवायू निर्माण करतात तसेच वायू प्रदूषण कमी करण्यास मदत करतात. निंबाचे झाड औषधी गुणधर्मांनी समृद्ध असून पर्यावरण शुद्ध ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. वृक्षारोपणामुळे भूजल संवर्धन, मृदा संरक्षण आणि जैवविविधतेच्या जतनालाही चालना मिळणार आहे.
युवा ग्रामीण पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावर विशेष वृक्षारोपण मोहीम राबवून पिंपळ, वड आणि निंबाच्या रोपांची लागवड करावी,अशी मागणी केली आहे. वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि भावी पिढ्यांना निरोगी पर्यावरण देण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.
