धान्य मोजण्याची जुनी मापे आजही जुन्या शेतकऱ्यांचे विश्वासू मोजायचे साधन
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
आजकालच्या डिजिटल युगात माणूस जीवन जगताना आपले सर्वकाही व्यवहार मोबाईलच्या सहाय्याने तर इतर उपकारणाच्या माध्यमातून करत असला तरी जुनं ते सोनं या युक्तिवादावर आजही अनेक शेतकरी विश्वास ठेऊन आहे.
हा विश्वास म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी आठवडा बाजाराची परंपरा डोळ्यासमोर आल्यावर त्या बाजारात गेल्यावर ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ इ. धान्य तर, जवस, तीळ, मूग, उडीद, सर्व डाळी याची एक वेगळी अर्थात पोत्यावर थाटलेली ही दुकाने आणि हा सर्व माल विकण्यासाठी उन्हातान्हात बसलेला शेतकरी जो स्वतःला कधीच मालक म्हणवून घेत नव्हता तो आठवतो. ग्राहकांच्या मागणीनुसार शेर, पितळाची किंव्हा पत्र्याच्या अधुली मापाच्या साहाय्याने मोजमाप करून वरील धान्य व कडधान्य विक्री करण्याची पद्धत होती. ती आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
ग्राहकांना देतात झुकते माप
ग्राहक हेच आपले माय बाप समजून भाऊ, दादा, आण्णा, आई, माऊली हे त्यांचे ग्राहकांना बोलतानाचे नम्रतेचे शब्द तर ग्राहकांच्या मागणीनुसार शेर, पितळाची किंव्हा पत्र्याच्या अधुली मापाच्या साहाय्याने मोजमाप करून वरील धान्य व कडधान्य विक्री करण्याची पद्धत होती. लोखंडी पत्र्याची मोजमापाची साधने अर्थात आठवा, अधुली याच्या साहाय्याने शेतकरी मागणीनुसार आपल्या ग्राहकांना सर्व वस्तू इमानदारीने देत असे. त्यात माप पूर्ण झाल्यावरही आणखी जास्त देण्याची अनोखी परंपरा होती तर भाजीपाला हा जुडी किंव्हा तराजूने देत परंतु त्यातही दगडाची मापे आणि वजन करताना ग्राहकांना झुकते असे जादा माप देऊन आपला धर्म शेतकरी राजा पाळत होता.

आजही बाजार पण बदलले आहे स्वरूप
पूर्वीसारखा बाजार आजही आहे मात्र याच बाजारात – इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, मोबाईलच्या आधारे ऑनलाईन पेमेंट सुविधा झाल्यामुळे पैशाचा बटवा किंव्हा कोपरीच्या खिशात असणाऱ्या एक रुपयापासून ते दहा, वीस रुपयांच्या नोटा, सुट्टया – पैशांची चिल्लर घेऊन आता कोणीही दिसत नाही त्यामुळे बदलत्या काळानुसार डिजिटल युगात बाजारही डिजिटल झाला असून जुने शेतकरी ही परंपरा क्वचितचं जोपसताना दिसतात तर अशा शेतकऱ्यांकडे आजकालचे लोक आश्चर्याने बघतात.
ग्राहकांना देवचं मानतो
काळ कितीही बदलला असेल मात्र शेतकरी राजा हा आजही ग्राहकांना देवचं मानतो तर ह्याच बाजाराच्या संस्कृतीवर सध्याच्या डिजिटल संस्कृतीने अर्थात मॉलने अतिक्रमण केले व काटेकोर केलेले वजन मापानुसार प्रत्येक वस्तू अथवा प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करून ग्राहकांना देण्याची नवीन सुविधा सुरु झाल्याने बाजारात जाऊन खरेदी करण्याचा आनंद मात्र लोप होत चाललेला आहे. अशाच या बाजारातील एक आठवण म्हणून जुन्या संस्कृतीला उजाळणी देताना लोप चाललेला आठवा मात्र आजही आदर्शाचे प्रतीक आहे हीच आपली संस्कृती आहे कि, जिचा आपणाला सार्थ अभिमान आहे.
आरोग्यदायी अन संस्कृती जपणारा आठवा
जुन्या संस्कृतीप्रमाणे धान्य मोजण्याचे लोखंडाच्या पत्र्याचा हा आठवा प्रत्येक घरातील एक वेगळा सदस्य होता जर कधी मान दुखू लागली तर आठवा उशाखाली घेऊन उपचाराची पद्धत होती, तर मुका मार लागल्यावर त्यात शेणाच्या गौऱ्याचा निखारा घालून शेक देण्याचा उपचार होता. तर नवीन लग्न झाल्यावर आपली सून ही लक्ष्मी म्हणून आपल्या घरात प्रवेश करत आहे असं समजून या आठव्यात तांदूळ भरून तो मुख्य प्रवेशद्वारावर उंन्यां-यावर ठेवला जायी व त्या आठव्याला नवीन लग्न होऊन आलेली मुलगी आपल्या उजव्या पायाने ठोकर मारून प्रवेश करण्याची परंपरा होती ती आजही कायम असली तरी आठव्याची जागा स्टीलच्या तांब्याने घेतली.
