श्रावणी सोमवारनिमित्त हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी.
पुरातन हेमाडपंथी मंदिरात भक्तिमय वातावरण.
साडेआठशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खंडेश्वराच्या दर्शनासाठी विदर्भासह मध्य प्रदेशातूनही भाविकांची उपस्थिती.
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
श्रावण महिना सुरू होताच नांदगाव खंडेश्वर येथील साडेआठशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेले श्री खंडेश्वर (महादेव) मंदिर भाविकांनी फुलून गेले आहे. श्रावणी सोमवार निमित्त पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रांग या ठिकाणी मंदिरात लागत असून, महादेवाच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय होत आहे. नांदगाव खंडेश्वरसह अमरावती जिल्हा, विदर्भातील विविध भाग तसेच मध्य प्रदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत आहेत.
अमरावतीपासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदगाव खंडेश्वर गावाच्या मध्यभागी हे पुरातन मंदिर उंच टेकडीवर वसले आहे. दगडी पायऱ्या चढून मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर काळ्या दगडांची भव्य तटबंदी आणि त्यामागे असलेले देखणे हेमाडपंथी मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेते.मंदिराच्या शिलालेखानुसार या मंदिराला सुमारे ८५० वर्षांचा इतिहास असून, शके ११७७ अर्थात इ.स. १२५५ च्या सुमारास देवगिरीचे राजे रामदेवराय यांचे पंतप्रधान हेमाद्रीपंत यांनी मंदिराचे बांधकाम केल्याचा उल्लेख आढळतो. मंदिरातील दगडी खांबांवरील राजपरिवार, राजनर्तकी, शिव-पार्वती तसेच विविध देवतांच्या अप्रतिम कोरीव मूर्ती आजही प्राचीन स्थापत्यकलेची साक्ष देतात.
मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात काळ्या पाषाणातील भव्य शिवलिंग असून, उत्तर दिशेला शिव-पार्वतीचे तर दक्षिण दिशेला भगवान नरसिंहाचे मंदिर आहे. तिन्ही मंदिरांसाठी एकच प्रशस्त सभामंडप असून, समोर आकर्षक नंदी विराजमान आहे. मंदिर परिसरातील सुमारे १०० फूट उंच दीपमाळही भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

श्रावणी सोमवारी महादेवाला जलाभिषेक, बेलपत्र व फुलांची पूजा करून भाविक दर्शन घेत आहेत. पहाटेपासून सुरू होणारी पूजा-अर्चा आणि सायंकाळची आरती यामुळे दिवसभर मंदिर परिसरात धार्मिक वातावरण पाहायला मिळत आहे.
स्थानिक श्रद्धेनुसार श्रावणी सोमवारी कोंडेश्वर, खंडेश्वर आणि बोंडेश्वर या तिन्ही देवांचे दर्शन घेतल्यास काशीला गेल्याचे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होते.
साडेआठशे वर्षांचा इतिहास आपल्या अंगावर बाळगून उभे असलेले श्री खंडेश्वर मंदिर आजही नांदगाव खंडेश्वरची ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख जपत आहे. श्रावण महिन्यातील भाविकांची वाढती गर्दी पाहता या पुरातन मंदिराचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
