
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुका अंतर्गत येणाऱ्या जनुना सावनेर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून मार्गक्रमण करणा-या प्रवाशांना अपघाताला आमंत्रण देणा-या बातम्या मागिल काही वर्षांत प्रकाशित झाल्या होत्या. याचीच दखल घेऊन धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांनी आपल्या प्रयत्नाने अर्थसंकल्पीय अंतर्गत सन २०२३ मध्ये लोणी मोरगाव जनुना टिमटाळा सावनेर रस्त्याचे मजबूतीकरण आणि रुंदीकरण करणेसाठी अंदाजित दोनशे पन्नास लक्ष रूपयांचा निधी शासनाकडून खेचून आणून लगेच भूमिपूजन ही केले.
काही दिवसांतच कामाला सुरुवात झाली, अंतिम टप्प्यात बारीक चुरा टाके पर्यंत काम सुरूच होते मात्र शेवटी रस्त्यावर एक दोन दिवसात डांबर पडणारच तोच कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे काम असे रखडले की जवळपास एक दोन वर्षे होऊनही ते काम पुर्णत्वास आले नाही. रस्ता पुर्णतः उखडून गेला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या सर्व गोष्टींचा त्रास सामान्य नागरिकांना होत असून जनुना, टिमटाळा, खिरसाना, निरसाना, सावनेर येथील स्वयंघोषित गाव नेतेही मुग गिळून बसले आहे, तर कंत्राटदारानेसुद्धा जाणीवपूर्वक पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले आहे. एवढा मोठा निधी शासनाकडून उपलब्ध करून सुद्धा कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्ता डांबरीकरण होत नसतांना अपघाताचे प्रमाण टाळावे यासाठी रस्ता डांबरीकरण त्वरित करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदारांना देण्यात यावे याकरिता टीमटाळा येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी जनप्रतिनिधींना प्रसिध्दी पत्रकान्वये साकडे घातले आहे.