२०१८ पासून वाहनाविना प्रकल्प अधिकाऱ्यांची धावपळ
अंगणवाडींच्या कामकाजावर परिणाम
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १६७ अंगणवाडी केंद्रांना भेटी देण्यासाठी आणि त्यांचे कामकाज तपासण्यासाठी अधिकारी वर्गाला दररोज तालुक्यातील ग्रामीण भागात जावे लागते.नांदगाव खंडेश्वर तालुका भौगोलिक दृष्टीने खूप मोठा असल्याने दुचाकी वाहनाने अंगणवाडी केंद्रांना भेटी देणे शक्य होत नाही मात्र गेल्या सहा वर्षांपासून या तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे शासकीय वाहन उपलब्ध नाही. परिणामी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला वाहनांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत असून या कार्यालयाचे नियमित कामकाज विस्कळीत झाले आहे.

पूर्वी वाहन होते पण आता नाही
सन २०१८-१९ पूर्वी या कार्यालयाकडे एक शासकीय वाहन उपलब्ध होते.मात्र ते वाहन खराब झाल्याने शासनाने ते डिस्मेंटल केले. त्यानंतर नवीन वाहनासाठी वारंवार प्रस्ताव सादर करण्यात आले परंतु अद्यापपर्यंत शासनाने कोणतेही वाहन उपलब्ध करून दिलेले नाही.
इतर अधिकाऱ्यांच्या वाहनावर काम अवलंबून
अंगणवाडी केंद्रांना भेटी देताना अधिकाऱ्यांना कधी बीडीओच्या वाहनाचा तर कधी इतर अधिकाऱ्यांच्या वाहनांचा आधार घ्यावा लागतो.काहीवेळा वाहनच उपलब्ध होत नसल्याने पाहणी दौरे रद्द करावे लागतात. किंवा दुचाकी वाहनाने जावे लागते यामुळे सर्वच ठिकाणी वेळेवर पोहचणे शक्य होत नाही परिणामी अंगणवाडी केंद्रांच्या समस्या दीर्घकाळ प्रलंबित राहतात
अंगणवाडींचे महत्वाचे कार्य
अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना पोषण आहार,आरोग्य तपासणी, शैक्षणिक उपक्रम यांसोबत गरोदर व स्तनदा महिलांना आहार वितरणाची जबाबदारी पार पाडली जाते. या केंद्रांचे कार्य सुरळीत चालावे यासाठी अधिकाऱ्यांची नियमित तपासणी अत्यावश्यक आहे.मात्र वाहन नसल्याने तपासणी दौरे अपुरे पडत आहेत अशी वस्तुस्थिती समोर आली आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांची दमछाक
वाहनाच्या अभावामुळे अधिकाऱ्यांना वैयक्तिक खर्च करून प्रवास करावा लागतो. खासगी वाहनाने किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून दौरे करावे लागत असल्याने वेळ पैसा आणि श्रम वाया जात आहेत. अधिकाऱ्यांमध्ये नाराजी असून शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
आकडेवारीतून वास्तव
# नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १६७ अंगणवाडी केंद्रे
# २०१८-१९ यावर्षी शासकीय वाहन डिस्मेंटल झाले
# आजपर्यंत नवीन वाहनांची उपलब्धता – o
# ६ वर्षापासून वाहनाविना अधिकाऱ्यांची धावपळ सुरू
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला तातडीने शासकीय वाहन उपलब्ध करून द्यावे,अशी मागणी करण्यात येत आहे.याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
