
नागरिकांमध्ये संतापाची लाट, जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीअंतर्गत सुरू असलेल्या १२ कोटी रुपयांच्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता, निकृष्ट दर्जा आणि बेकायदेशीर हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण असून, शासनाच्या निधीची उघडपणे उधळपट्टी होत असल्याचे आरोप आहेत.
अधिकृत ठेकेदार बाजूला; भाजप पदाधिकारीच करतात कामे!
या विकासकामांची जबाबदारी कागदोपत्री ठेकेदारांकडे असली तरी प्रत्यक्षात भाजपचे स्थानिक पदाधिकारीच ही कामे हाताळत असल्याचे उघड झाले आहे. यापैकी अनेकांना तांत्रिक ज्ञान वा अनुभव नसताना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमार्फत कामे सुरू ठेवली आहेत. परिणामी, कामांचा दर्जा अत्यंत सुमार असून, सार्वजनिक धनाचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
‘तक्रार करा कुठेही, आमचं काही बिघडत नाही!’ – कार्यकर्त्यांचा उद्धटपणा
या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे कार्यकर्तेही उद्धट भाषा वापरत असल्याचे समोर आले आहे. काही नागरिकांनी सांगितले की, “तक्रार कुठेही करा, आमचे काहीही होणार नाही. सत्ता आमच्याच पक्षाची आहे, आमदारही आमचाच आहे,” असे खुलेआम बोलले जात आहे. हे विधानच प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचे सूचित करते.
प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष
या गंभीर प्रकरणात नगर पंचायत प्रशासन आणि मुख्याधिकारी दोघेही निष्क्रिय असून, नागरिकांनी केलेल्या तक्रारींकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे आरोप आहेत. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासकीय दुर्लक्ष यांचे घातक समीकरण तयार झाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी; नागरिक आंदोलनाच्या तयारीत
या सर्व परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली असून, या कामांची सखोल तपासणी करण्यासाठी कॉलिटी कंट्रोल यंत्रणा लावून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा, रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा – नांदगाव खंडेश्वरकरांची मागणी
सध्या नांदगाव खंडेश्वरमधील नागरिकांची एकच मागणी आहे – “या बोगस आणि बेकायदेशीर विकासकामांवर तातडीने लगाम घालावा, संबंधित पदाधिकाऱ्यांवर आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी.” अन्यथा, या भ्रष्ट आणि अपारदर्शक कारभाराविरुद्ध जनआंदोलन तीव्र होणार, हे निश्चित!
बातमी मधे सुधारणा करावी.
अर्धी हिंदी अर्धी मराठी भाषा दिसते